ओझर विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांना आहारविषयक मार्गदर्शन

Dietician Dr. Gargi Oraskar Guides Students on Healthy Eating at Ozhar Vidyamandir, Kandalgaon




मालवण (प्रतिनिधी) :
विद्यार्थ्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकास, अभ्यासातील एकाग्रता तसेच आरोग्य उत्तम राखण्यासाठी संतुलित आहारासोबत नियमित व्यायाम, ध्यानधारणा आणि मैदानी खेळ आवश्यक आहेत, असे मार्गदर्शन आहारतज्ज्ञ डॉ. गार्गी गौरव ओरसकर यांनी केले.

उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव येथे ‘एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा राजमार्ग’ या उपक्रमांतर्गत आरोग्यविषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘विद्यार्थ्यांसाठी आहार’ या विषयावर डॉ. ओरसकर यांनी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधला.

विद्यार्थ्यांच्या दैनंदिन आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि तंतुमय पदार्थांचा योग्य समावेश असणे गरजेचे आहे. विशेषतः व्हिटॅमिन बी-१२ आणि व्हिटॅमिन डी यांची योग्य पातळी राखण्याकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले. जंक फूड, तेलकट व तळलेले पदार्थ तसेच पॅकबंद अन्नपदार्थ टाळण्याचा सल्लाही त्यांनी दिला. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक एकाग्रतेसाठी नियमित व्यायाम, ध्यानधारणा आणि मैदानी खेळांचे महत्त्व त्यांनी विशद केले. विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुलांच्या आहाराच्या सवयी घडवण्यात पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगत त्यांनी पालकांना दैनंदिन आहाराकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या. व्याख्यानानंतर आरोग्यविषयक समस्या असलेल्या विद्यार्थी आणि पालकांना त्यांच्या विनंतीनुसार वैयक्तिक मार्गदर्शन करण्यात आले.

हा कार्यक्रम ओझर विद्यामंदिर, कांदळगावच्या माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष राजेंद्र कदम यांच्या प्रायोजकत्वातून आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केल्याबद्दल मुख्याध्यापक डी. डी. जाधव यांनी डॉ. गार्गी ओरसकर यांचे आभार मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राकेश कदम उपस्थित होते. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद लाभला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.