मालवणमध्ये २५ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय खुली स्वरचित काव्यवाचन स्पर्धा

 


मालवण (प्रतिनिधी) : नवोदित आणि हौशी कवींना आपल्या प्रतिभेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने भरड, मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिराच्या वतीने कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हास्तरीय खुली स्वरचित काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रविवार, २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता ही स्पर्धा होणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या कवींनी स्वतःची स्वरचित कविता सादर करणे आवश्यक आहे. कविता मराठी किंवा मालवणी भाषेत असावी. कवितेच्या विषयावर कोणतेही बंधन नसून, कवितेची मर्यादा २५ ओळींपर्यंत ठेवण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्या २० स्पर्धकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

इच्छुक स्पर्धकांनी आपली स्वरचित कविता गुरुवार, २२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत श्री शिवाजी वाचन मंदिर, भरड, मालवण येथे पाठवावी किंवा प्रत्यक्ष आणून द्यावी. निवड झालेल्या स्पर्धकांना दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. निवड झालेल्या कवींची प्रत्यक्ष काव्यवाचन स्पर्धा २५ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता होईल.

स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रथम क्रमांकासाठी १,५०० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १,००० रुपये, तृतीय क्रमांकासाठी ७५० रुपये, तर उत्तेजनार्थ प्रथम आणि द्वितीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५०० व ३०० रुपये पारितोषिक देण्यात येईल. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व कवींना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्पर्धकांनी कवितेखाली आपला संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक नमूद करावा. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी ९४२२०५४६०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन श्री शिवाजी वाचन मंदिराच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.