भित्तिचित्रांची एक वेगळीच दुनिया असते. ही दुनिया एक वेगळाच काळ उभा करते. मागच्या काही दिवसात मुंबईत अनेक ठिकाणी मिळणारा हा अनुभव वेंगुर्ल्याच्या नवीन मासे मार्केटमध्ये मिळतो तेव्हा तुम्ही चित्र पाहताना त्या चित्रात तुम्ही स्वतःला शोधत राहता आणि मग स्वतःसोबत ती सगळी चित्र जगू लागता !
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या, सागररत्न मत्स्य बाजारपेठेचे उदघाटन करण्यात आलंय. खरंतर मासे मार्केट म्हटलं की जो एक टिपिकल गंध, दृश्य, नाद सोहळा असतो त्या भवतालात मार्केट जिवंत राहत असते. स्थानिकांसाठी ती फक्त मासे 'पर्चेस' करायची जागा असते, पण खरं सांगू का, अनकांसाठी ती जागा म्हणजे 'ऑक्सिजन बार' असतो. एरवी घरी आणलेल्या माशांवर बारीक नजर असणारा 'मार्जार धर्म' हा मार्केटमध्ये कोळीणीच्या शेजारी बसून मांजरी, माशाला विकत घेईपर्यंत शांत कशा पाहतात हा प्रश्न आहे म्हणा! मासे विकत घ्यायच्या अनेक जागा असतात, पण मार्केटच्या कल्लोळात आपल्याला हवा तो मासा शोधायला, तो वाटा भेदायला 'अर्जुनाची'च नजर हवी म्हणा..
वेंगुर्ल्याच्या मार्केटशी केवळ वेंगुर्ल्याच्याच नाहीतर अस्सल खवय्यांचे एक नाते होते. जुन्याच्या जागी नवं मार्केट उभ्या राहताना जुन्या भिंतीतले ते आठवणींचे घरपण कसे उभं राहणार हा प्रश्न होता. पण त्याच मातीत घट्ट रुजलेल्या माशांच्या पाण्यातून पुन्हा भिंती उभ्या राहिल्या, आणि आकाराला आली एक नवे मत्स्य बाजारपेठ !
सागररत्न मत्स्य बाजारपेठ ही मत्स्यप्रेमींसाठीच नाही तर पर्यटकासाठी डोळ्यात साठवायच्या आठवणींचा वारसा बनणारी जागा बनलीय. आणि याला कारण ठरतायत सागररत्नच्या भिंतीवरच्या अफलातून चित्रकृती.. प्रत्येक चित्रातून साकारलेले आठवणींचे जग म्हणजे ना दळवींच्या 'सारे प्रवासी घडीचे'चे जिवंतपणा आहे असे जरी म्हटलं तरी ते शाश्वत राहील म्हणा !
व्यक्तिरेखा साकारलेल्या या चित्रातून संवाद बोलके झालेत ! आभाळातुन जाणारे विमान , विमानाच्या पातीला लटकलेला को पायलट, "तुम्हारा गाव आया कुदो" ही कल्पनाच भन्नाट आहे.आणि त्याचवेळी "आये विमान" ही प्रत्येकाला आठवणारी बालपणाची गोष्ट आहे. "माका बघुक येतले" म्हणणारे युवतीपण, "आग्गोबाय वळेसार" म्हणणारा सौभाग्यपण खूप काही सांगून जाते. आणि कोंबडा म्हणजे 'वडाप', "बाबानू माका काळीज" ही प्रत्येकाची गोष्ट गावच्या श्रीमंत जगण्याची गोष्ट बनलीय
वेंगुर्ला म्हणजे सुखाचा मोह आहे. तेच गावपण या चित्रात भरुन पावलंय ! माडावर चढणाऱ्या माणसाची " आडसार होया" अशी साद.. वेंगुर्ला शिरोडा एसटी आणि प्रवासी, मुलांना शोधण्यास आलेले गुरुजी, तरव्यात माखलेले मुले, लावणी करतानाच्या स्त्रिया, टिपिकल हाटेल, मासे विकणारी कोळीण, मत्स्यदर्प सहन न झालेले भटजी काका आणि माडाच्या मुळात शांत पहुडलेले जगण्याचे मालवणीपण , आणि त्यांचा तो प्रश्न " आज काय इला?"
हे जगणं ज्यांनी अनुभवलय, त्यांना त्या सुखापुढे कसलीच श्रीमंती ही कधीच मोठी वाटणार नाही म्हणा!
खरतर चित्र म्हणजे दृश्याचा अनुभव असतो, पण हे चित्र एकदा झूम करून पहा. कल्लोळ आहे कल्लोळ ! जत्रा, दशावतार, बाजारपेठ, गरमागरम भजी ते फटकीचो वाको इलो पर्यंत.. सगळंच एवढ पिरियडेटिक आहे की 'वीर वब्रुवाहन' पण फील कराल !!
मासे विकायला आणतात तेव्हा त्यांची फडफड होत नसते. शांत असते.. किनारपट्टीवरच्या या बाजाराच्या आठवणी तशा मुकच आहेत पण मनात आठवणीची फडफड निर्माण करत राहतात.. सगळं आजही अनुभवण्यासारखे आहे.. म्हणून वेंगुर्ला तुम्हाला ओढत राहते, जगवत राहते..
चित्रं ही आठवणींचा खेळ असतात. त्यांना वर्तमानकाळातून पुन्हा भूतकाळात ओढून नेणे हा प्रकार कमाल असतो. मार्केटमध्ये आलेला 'सुसला' आणि अनेक प्रश्नचिन्हाचा खेळ चेहऱ्यावर एक मिश्किलपणा देऊन जाते ! राजन गिरप यांच्या संकल्पनेतून उतरलेला हा विचार कलादिग्दर्शक प्रा.सुनील नांदोस्कर यांनी बोलका केलाय. आणि सगळ्यात महत्वाचे यामेश खवणेकर, मोहन नवार, स्वप्नील मेस्त्री, पांडुरंग नाईक, नितीन नार्वेकर अशा युवा प्रतिभावंतांनी साकारलेल्या या कलाकृती एकसंघ परिणाम देतात.
विख्यात चित्रकार डी कोस्टा किंवा मारिओ मिरांडाने जसा व्यक्तिरेखांचा उभा परिणाम बिंबवून प्रत्येक चित्रात गजबजलेला गाव उभा केला होता अगदी तोच परिणाम इथेही जाणवतो. ही चित्रे ब्लॅक एन्ड व्हाईट आहेत पण तरीही ती इस्टमनकलर वाटतात..ती फक्त भिंतीवरच रेखाटलेली चित्र असली तरीही प्रचंड बोलत राहतात. नव्या बदलात जुने मागे पडते म्हणतात, पण वेंगुर्ला सागररत्न मत्स्य बाजारपेठ मध्ये नव्याने पुन्हा एकदा जुन्याला कालातीत जिवंत केलंय एवढं मात्र नक्की !
- सिंधुदुर्ग360
(फोटो सौजन्य - आशीर्वाद डिजिटल एन्ड इन्फोटेक)
कोकणी मानसाचा खरा जगना
ReplyDeleteMastt..pahil prem kokan
ReplyDeleteKhup sundar.,, abhinandan all B. S. Bandekar college team and Prof. Nandoskar Sir,,, hats off
ReplyDeleteNice👍👍👍👍👍👍👍
ReplyDelete