मालवणच्या किनाऱ्यावर ‘कोस्टल कोकोनट वॉर’चा जल्लोष
नारळी पौर्णिमा आपण अनेक वर्ष पाहत आलोय. पण मागची पंधरा वर्षं जशी या सणाने रंग बदलले, तशीच यंदा ‘कोस्टल कोकोनट वॉर’ने नवा अध्याय सुरू केला. मालवणच्या किनाऱ्यावर झालेल्या या नारळ फोडण्याच्या स्पर्धेने केवळ गावाचा नव्हे तर संपूर्ण कोकणाचा उत्साह उंचावला आहे.
सोन्याच्या भावाचा नारळ
साडेसातशे किमी लांबीच्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर — केवळ मालवणमध्येच यंदा किमान पाच हजार नारळ फोडले गेले. एवढंच नव्हे, तर स्पर्धेसाठी आणलेला सर्वात महागडा नारळ 20 ते 30 हजार रुपयांच्या घरात गेला. लाखोंच्या बक्षिसांनी सजलेली ही स्पर्धा यंदा राज्यस्तरीय झाली असून, पुढच्या वर्षी ती राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर झेपावेल यात शंका नाही.
मालवणचा उत्सव, सोशल मीडियावर ट्रेंड
इंस्टा, थ्रेड्स, फेसबुक—सगळीकडे फक्त मालवणच्या नारळ फोडण्याच्या व्हिडिओंचा पूर आला होता. महिला, पोलीस, तरुण, लहान मुले—सगळेच उत्साहाने सहभागी झाले. चार चार इव्हेंट एकमेकांच्या शेजारी, पण कुठे गोंधळ नाही, पंगा नाही. महिलांची उपस्थिती तर अफाट! रात्री बारा वाजता दीड हजार नारळ घेऊन मुंबईवाल्यांना आव्हान दिलं जात होतं—“हिम्मत असेल तर फोडा!”
ताकद, तंत्र आणि टायमिंगचा खेळ
पूर्वी मच्छीमार व तरुणांनी ताकद व चातुर्य आजमावण्यासाठी हा खेळ सुरू केला. आज मात्र हा ताकदीसोबत तंत्राचा खेळ झाला आहे.
स्पर्धेची पद्धत:
प्रत्येक खेळाडू हातात नारळ घेतो.
दोन खेळाडू समोरासमोर उभे राहतात.
ठरलेल्या इशाऱ्यावर नारळ जोरात आपटले जातात.
ज्याचा नारळ अखंड राहतो तो पुढच्या फेरीत जातो.
शेवटपर्यंत टिकलेला नारळ आणि त्याचा मालक — विजेता!
फक्त ताकद पुरेशी नाही; योग्य कोन, पकड, गती आणि अचूक वेळ हाच विजयाचा मंत्र आहे.
‘प्रो गोविंदा’सारखीच थरारक
स्पर्धेतील जल्लोष, आरोळ्या आणि प्रत्येक आपटीवर रोखलेला श्वास—हा थरार पाहून मुंबईच्या ‘प्रो गोविंदा’ची आठवण झाली असती. फरक इतकाच—तिथे मानवी मनोरा लागतो, इथे स्टीलसारखी मनगटं.
बाहेरगावचा सहभाग आणि अर्थकारण
अलिबाग, मुंबईसह बाहेरगावचे खेळाडू यंदा खास मालवणला आले. यामुळे ही केवळ ‘गावाची जत्रा’ न राहता ‘प्रो कोकोनट क्रश वॉर’ बनली आहे.
नारळांचे प्रकार—राशीचे, लढवचे, हौशीचे आणि ‘क्वांयटा’चे—यांमुळे अर्थकारण लाखांपर्यंत पोहोचले. भविष्यात हे कोटींच्या बिझनेसपर्यंत जाण्याची क्षमता आहे.
सण, खेळ आणि नवी पिढी
समुद्र किनाऱ्यावर पैशाचा ओघ कायम राहील, पण या सणाने एक मोठा बदल घडवला आहे—मोबाईल बाजूला ठेवून हातात नारळ घेत नवी पिढी खेळाकडे वळत आहे. आणि हेच खरं सोनं आहे!