First Ghungurkathi Sindhudurg District Marathi Literary Conference on November 1 at Kasal
डॉ. महेश केळुसकर अध्यक्षस्थानी; रंगकर्मी श्रीनिवास नार्वेकर यांच्या हस्ते उद्घाटन, ५० साहित्यिक-कवींचा सहभाग
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या साहित्यिक परंपरेचा जागर घडविणारे पहिले ‘घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन’ रविवार, १ नोव्हेंबर रोजी कसाल येथील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करण्यात आले आहे. ‘घुंगुरकाठी’ संस्थेच्या वतीने होणाऱ्या या दिवसभराच्या संमेलनात जिल्ह्यातील सुमारे ५० साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि कलाकार सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ कवी डॉ. महेश केळुसकर संमेलनाच्या अध्यक्षस्थानी, तर रंगकर्मी व दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरीकार प्रा. प्रवीण बांदेकर यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्ष, उद्घाटक, निवेदक यांच्यासह व्यासपीठावरील सर्व सहभागी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असणार आहेत. जिल्ह्याबाहेरील साहित्यिकांना निमंत्रित न करता स्थानिक साहित्यिक, कवी, अभ्यासक आणि कलाकारांच्या सहभागातून जिल्ह्याच्या साहित्यिक-सांस्कृतिक परंपरेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे. हे संमेलन सर्व साहित्यप्रेमी आणि रसिकांसाठी खुले राहणार आहे. संस्थेचे अध्यक्ष अवधुत मालणकर यांची स्वागताध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सात सत्रांतून साहित्याचा जागर
दिवसभर चालणाऱ्या या संमेलनात उद्घाटन, परिसंवाद, कथाकथन, प्रकट मुलाखत, काव्यरंग, निमंत्रितांचे कविसंमेलन आणि खुले कविसंमेलन अशी सात सत्रे होणार आहेत. सकाळी १० वाजता ग्रंथपूजनाने संमेलनाचा प्रारंभ होईल. लोककलेच्या आगळ्यावेगळ्या आविष्कारातून संमेलनाची सुरुवात करण्याचे नियोजन आहे. उद्घाटन सत्रात स्वागताध्यक्ष अवधुत मालणकर, प्रमुख पाहुणे प्रा. प्रवीण बांदेकर, उद्घाटक श्रीनिवास नार्वेकर आणि अध्यक्ष डॉ. महेश केळुसकर यांची भाषणे होतील.
दुसऱ्या सत्रात प्रा. डॉ. गोविंद काजरेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘मालवणी मुलखातील लोकसाहित्य’ या विषयावर परिसंवाद होईल. यात लेखिका उषा परब लोककथा आणि दंतकथा, कवी अजय कांडर ओव्या, फुगडीगीते व लोकगीते, अभ्यासक जी. ए. सावंत उखाणे, कोडी व हुमाणी, तर सदाशिव गावकर म्हणी आणि वाक्प्रचार या विषयांवर आपले विचार मांडतील.
तिसऱ्या सत्रात लेखिका वृंदा कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन होणार असून, लेखिका वैशाली पंडित आणि कवी भाऊसाहेब गोसावी सहभागी होतील.
दशावतारातील भीष्माचार्यांची प्रकट मुलाखत
भोजनोत्तर चौथ्या सत्रात दशावतारातील ज्येष्ठ कलाकार भीष्माचार्य यशवंतकाका तेंडोलकर यांची प्रकट मुलाखत होणार आहे. मालवणी बोलीचे अभ्यासक प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत आणि ‘मराठी आठव दिवस’ उपक्रमाचे संकल्पक पत्रकार रजनीश राणे ही मुलाखत घेतील. दशावतार कलेचा प्रवास आणि अनुभव जाणून घेण्याची संधी या सत्रातून रसिकांना मिळणार आहे.
पाचव्या सत्रातील ‘काव्यरंग’ हा मालवणी कवितांचा नाट्याविष्कार असेल. अभिनेते अभय खडपकर, निलेश पवार आणि सिद्धी वरवडेकर हे डॉ. सई लळीत यांच्या दोन मालवणी कवितांचे अभिनय सादर करणार आहेत.
सहाव्या सत्रात निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. यात संध्या तांबे, रुजारिओ पिंटो, डॉ. सई लळीत, विठ्ठल कदम, सरिता पवार, निलेश गावकर आणि कल्पना मलये सहभागी होतील. सातव्या आणि अंतिम सत्रात खुले कविसंमेलन होणार असून, संमेलनस्थळी नोंदणी करणाऱ्या कवी-कवयित्रींना कविता सादर करण्याची संधी मिळणार आहे. संपूर्ण संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व अभिनेते निलेश पवार करणार आहेत.
वाचनसंस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्न
मोबाईलचा वाढता वापर आणि वाचनाचे कमी होत असलेले प्रमाण लक्षात घेऊन रसिकांना पुन्हा साहित्याकडे वळविण्याच्या उद्देशाने ‘घुंगुरकाठी’ संस्थेने जानेवारी २०२५ मध्ये ओरोस येथे ‘आम्ही साहित्यप्रेमी’ या व्यासपीठाची स्थापना केली. या व्यासपीठाच्या माध्यमातून आतापर्यंत सलग १९ मासिक साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाला मिळालेल्या प्रतिसादातून दिवसभराचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कसाल यांच्या सहकार्याने होणाऱ्या या संमेलनातून सिंधुदुर्गातील साहित्यिकांना एकत्र आणण्याबरोबरच मालवणी लोकसाहित्य, बोलीभाषा, कविता, कथा आणि लोककलेच्या विविध पैलूंना व्यासपीठ मिळणार आहे. जिल्ह्याच्या साहित्यिक-सांस्कृतिक वैभवाचा परिचय करून देणारा हा साहित्यिक जागर रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
Meta Description (English): The first Ghungurkathi Sindhudurg District Marathi Literary Conference will be held at Kasal on November 1, featuring poet Dr. Mahesh Keluskar as president, theatre personality Shrinivas Narvekar as inaugural guest, and around 50 local writers and poets across seven sessions.
