गावागावांत पोहोचणार आरोग्यसेवा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ

 Sindhu Jan Samvad Health Yatra Launched in Sindhudurg to Reach Rural and Remote Villages




मोबाईल मेडिकल युनिट आणि व्हॅक्सिन व्हॅनच्या माध्यमातून दुर्गम भागांतील नागरिकांपर्यंत पोहोचणार आरोग्य यंत्रणा


सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नागरिकांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सुमारे ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून गावागावांत आरोग्यसेवा पोहोचविण्यात येणार आहे. मोबाईल मेडिकल युनिट आणि व्हॅक्सिन व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत आरोग्य यंत्रणा पोहोचणार आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि काही भागांतील दुर्गमता यामुळे आरोग्यसेवा पोहोचविताना अनेक अडचणी येतात. दुर्गम भागांत डॉक्टरांची उपलब्धता, आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका पोहोचण्यातील अडथळे आणि नेटवर्कच्या समस्या यांमुळे नागरिकांना वेळेवर उपचार मिळविणे कठीण होते. ही परिस्थिती लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेने अशा अभियानांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत थेट पोहोचून सेवा देण्याला प्राधान्य द्यावे, अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या.


नागरिकांनी आरोग्यसेवेसाठी यंत्रणेपर्यंत येण्याऐवजी आरोग्य यंत्रणेने नागरिकांपर्यंत पोहोचणे ही कौतुकास्पद बाब आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागांतील नागरिकांना आरोग्यसेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असून, या यात्रेमुळे नागरिकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या संकल्पनेला राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही पसंती दर्शविली असून, महाराष्ट्रातील इतर भागांतही अशा प्रकारचा उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने विचार सुरू असल्याचे राणे यांनी सांगितले.


जिल्ह्यातच दर्जेदार उपचार उपलब्ध करून देण्यावर भर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्याही रुग्णाला उपचारांसाठी अन्य जिल्ह्यात जाण्याची वेळ येऊ नये, तसेच जिल्ह्यातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या दृष्टिकोनातून सर्वांनी काम करणे आवश्यक असल्याचे पालकमंत्री राणे यांनी स्पष्ट केले. रुग्णांना योग्य निदान आणि आवश्यक उपचार स्थानिक पातळीवर मिळावेत, यासाठी शासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभाग प्रयत्नशील आहेत.

आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करणे, जिल्ह्यात उपलब्ध नसलेल्या उपचार सुविधा सुरू करणे आणि आरोग्यसेवेचा दर्जा उंचावणे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. काही नागरिकांना आरोग्य शिबिरांपर्यंत पोहोचणे शक्य होत नाही. अशा नागरिकांपर्यंत मोबाईल आरोग्य युनिटच्या माध्यमातून आरोग्यसेवा पोहोचविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.


गरजू रुग्णांसाठी आरोग्य यात्रा महत्त्वाची

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केंद्र, राज्य शासन आणि जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून विविध आरोग्यविषयक योजना राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. सातत्याने उपचारांची गरज असलेल्या रुग्णांसाठी ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रा’ महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.


यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, रूहीता तांबे, जिल्हा परिषद सदस्य शीतल दळवी व सुप्रिया मेस्त्री, तहसीलदार दीक्षांत देशपांडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, डॉ. सुबोध इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी पूजा काळगे, सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच रविराज मोरजकर, पंढरी वायंगणकर, डॉ. पंकज पाटील, उपसभापती राजेश उर्फ सोनू सावंत, दिलीप तळेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लाभार्थ्यांना विविध आरोग्यविषयक लाभांचे वितरण करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.