कवी केशवसुतांच्या जन्मभूमीत रंगणार साहित्याचा कुंभ; १८ वे कोकण मराठी साहित्य संमेलन मालगुंडमध्ये!

 



२७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान साहित्यपर्व; ज्येष्ठ विज्ञानलेखक डॉ. बाळ फोंडके संमेलनाध्यक्ष, ध्वज आणि बोधचिन्हाचे अनावरण

रत्नागिरी : आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांच्या जन्मभूमीत यंदा साहित्याचा जागर रंगणार आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेचे १८ वे मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन २७ ते २९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत मालगुंड येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या पूर्वतयारीचा महत्त्वाचा टप्पा म्हणून साहित्यध्वज आणि बोधचिन्हाचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यामुळे संमेलनाच्या आयोजनाला आता वेग आला आहे. 

साहित्यध्वज अन् बोधचिन्हातून साहित्यसंस्कृतीचा जागर

मालगुंड येथील कवी केशवसुत स्मारकाच्या परिसरात होणाऱ्या या अनावरण सोहळ्याला कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संमेलनाचे कार्यवाह गजानन पाटील, कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

कोकणच्या मातीतल्या शब्दांना निसर्गाचा गंध आणि समुद्राच्या लाटांची गाज लाभली आहे. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानप्रधान युगात माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचे सामर्थ्य साहित्यात आहे, असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले. साहित्यध्वज आणि बोधचिन्ह हे केवळ संमेलनाचे प्रतीक नसून साहित्य, संस्कृती, विचार आणि संवेदनशीलतेचा संदेश देणारे माध्यम असल्याचेही त्यांनी नमूद केले.

डॉ. बाळ फोंडके यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य-संशोधनाचा संगम

या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ विज्ञानलेखक डॉ. बाळ फोंडके भूषवणार आहेत. विज्ञान आणि साहित्य यांचा परस्परसंबंध, नव्या पिढीतील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि बदलत्या काळातील साहित्याची भूमिका या विषयांवर संमेलनात चर्चा होण्याची अपेक्षा आहे. राज्यभरातील नामवंत साहित्यिक, कवी, समीक्षक आणि वाचक या साहित्यसोहळ्यात सहभागी होणार आहेत.

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर यांनी साहित्य संमेलने शहरांपुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत आणि तरुण पिढीपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या हातात लेखणी देऊन त्यांना साहित्याच्या माध्यमातून विचार व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा अशा उपक्रमांचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

तरुणांना जोडण्यासाठी ग्रंथदिंडी

संमेलनाच्या माध्यमातून शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना साहित्याशी जोडण्यासाठी विशेष ग्रंथदिंडीसह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. वाचनसंस्कृतीचा प्रसार, मराठी भाषेचे संवर्धन आणि नव्या पिढीमध्ये लेखनाची आवड निर्माण करणे यावर भर दिला जाणार आहे.

कोकण मराठी साहित्य परिषदेने गेल्या अनेक वर्षांत कोकणचा भाषिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम केले आहे. कवी केशवसुत यांच्या स्मारकाच्या साक्षीने होणारे हे संमेलन साहित्यिक संवाद, नव्या विचारांची देवाणघेवाण आणि वाचकांच्या सहभागासाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

कवी केशवसुतांच्या भूमीत पुन्हा एकदा मराठी शब्दांची तुतारी घुमणार असून, २७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान मालगुंडमध्ये साहित्यरसिकांचा मेळा रंगणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.