“शिवनामाच्या जयघोषात रयतेचा महासागर : श्री देव रामेश्वरांची सिंधुदुर्गावर शिवभेट”


निळ्याशार अरबी समुद्राच्या लाटांवर सकाळच्या वाऱ्याने हलकेच कुजबुज सुरू केली होती…

सिंधुदुर्ग अजूनही त्या क्षणाची वाट पाहत उभा होता. ज्या किल्ल्याच्या दगडांत छत्रपती शिवाजी महाराजांचा श्वास, पराक्रम आणि स्वराज्याची शपथ आजही गुंजत आहे, त्या गडावर आज पुन्हा इतिहास जागा होणार होता.

शिवकाळापासून अखंड चालत आलेल्या परंपरेचा दिवा हाती घेऊन, कांदळगावच्या राऊळातून श्री देव रामेश्वर निघाले होते. ढोल-ताशांचा गजर म्हणजे रणभेरीचा नाद वाटावा असा, आणि शिवनामाचा जयघोष म्हणजे स्वराज्याचा हुंकार भासावा असा!
 हजारो रयतेच्या पावलांत भीती नव्हती, थकवा नव्हता..होता फक्त तोच अनामिक आत्मविश्वास, जो कधी काळी शिवरायांच्या मावळ्यांच्या डोळ्यांत चमकत असे.

आज देव चालत होते, पण सोबत चालत होता इतिहास…

आज भेट होणार होती दोन शिवांची
एक स्वराज्य घडवणारा, आणि दुसरा त्या स्वराज्याला आशीर्वाद देणारा...


शिवकाळापासून अखंडपणे चालत आलेल्या रूढी–परंपरेचा मान राखत कांदळगावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर यांनी आज पहाटेपासून इतिहासाची साक्ष देणारा भव्य आणि भक्तिभावाने ओथंबलेला सोहळा अनुभवास दिला. सकाळी ठीक नऊ वाजता आपल्या पंचायतनासह आणि हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या रयतेला सोबत घेऊन श्री देव रामेश्वर किल्ले सिंधुदुर्गावरील छत्रपती शिवाजी महाराज व आदिमाया श्रीदेवी भवानी यांच्या भेटीसाठी प्रस्थान झाले.

कांदळगाव येथील राऊळात गुरवांनी पारंपारिक पद्धतीने खड्या आवाजात गाऱ्हाणे घालताच, एका विलक्षण आत्मविश्वासाने आणि भक्तिभावाने भारलेली रयत देवासोबत मंदिराबाहेर पडली. ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची तुफानी आतषबाजी आणि “शिवनामाचा जयघोष” यामध्ये श्री देव रामेश्वरांची पालखी व देवदेवतांचे तरंग कांदळगावहून मालवणच्या दिशेने सुमारे तीन तास कूच करीत होते. या मार्गावर ठिकठिकाणी भाविकांनी पुष्पवृष्टी व जल्लोषात देवाचे स्वागत केले.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्री देव रामेश्वरांचे मालवण शहरात आगमन झाले. कोळंब येथे मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांनी व्यापाऱ्यांसह तर नगराध्यक्षा सौ. ममता वराडकर यांनी नगरसेवकांसमवेत देवाचे भक्तिभावाने स्वागत केले. यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, सहदेव बापर्डेकर, नगरसेविका पूनम चव्हाण, अश्विनी कांदळकर, मेघा सावंत, परशुराम पाटकर, शिल्पा खोत, यतीन खोत, गणेश नेरकर, राजू बिडये, संदेश कोयंडे, गणेश प्रभूलकर, सूर्यकांत फणसेकर, राजन वराडकर, छोटू तारी यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते.
कांदळगावहून निघाल्यानंतर तब्बल सात तासांच्या प्रवासानंतर श्री देव रामेश्वर पंचायतन व रयतेसह मालवणच्या सागरात वसलेल्या किल्ले सिंधुदुर्गावर पोहोचले. तेथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावन स्मृतींना साक्ष ठेवत पार पडलेली “दोन शिवांची भेट” हा क्षण उपस्थित प्रत्येकासाठी याची देही याची डोळा अनुभवण्यासारखा ठरला. शिवनामाच्या गजराने किल्ला दुमदुमून गेला.

या ऐतिहासिक भेटीदरम्यान रयतेसह श्री देव रामेश्वरांनी आदिमाया, आदिशक्ती आई भवानीचे दर्शन घेतले. जवळपास तीन तास चाललेल्या या अलौकिक सोहळ्याने भक्तांचे डोळे तृप्त झाले. परंपरेनुसार श्री देव रामेश्वर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वतीने एकमेकांना भेटीचे नजराणे अर्पण करण्यात आले.

श्रद्धा, इतिहास आणि शिवकालीन परंपरेचा संगम असलेला हा सोहळा मालवणच्या इतिहासात आणखी एक सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणारा अध्याय ठरला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.