दिल्लीतील कर्तव्य पथ येथील ७७ व्या प्रजासत्ताक दिन मुख्य सोहळ्यासाठी आजगावच्या सरपंच यशश्री सौदागर यांना विशेष निमंत्रण

पंचायत राज ग्रामविकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने दिल्ली येथील कर्तव्य पथवर आयोजित करण्यात येणाऱ्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यासाठी आजगावच्या सरपंच यशश्री सौदागर यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातून एकूण १६ जिल्ह्यांतील १६ सरपंचांची या सोहळ्यासाठी निवड करण्यात आली असून, त्यांच्या सोबत महाराष्ट्र पंचायत राज विभागाचे दोन नोडल अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सर्वांचे २४ ते २६ जानेवारी दरम्यान नवीन महाराष्ट्र सदन, दिल्ली येथे वास्तव्य असणार आहे.

नियोजित कार्यक्रमानुसार, २५ जानेवारी रोजी सकाळी पंतप्रधान संग्रहालयाला भेट देण्यात येणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ७.०० वाजता पंचायत राज ग्रामविकास मंत्रालयाच्या वतीने ‘ग्राम सर्वोदय’ मासिकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यानंतर देशपातळीवरील विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण माननीय केंद्रीय पंचायत राज मंत्री यांच्या हस्ते होणार आहे.

२६ जानेवारी रोजी दिल्लीतील कर्तव्य पथवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यास उपस्थिती हा कार्यक्रमाचा मुख्य भाग असणार आहे.

आजगावच्या सरपंच यशश्री सौदागर यांना मिळालेल्या या मानामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांना विविध स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.