आता कोकणच्या शेतकऱ्यांचे आझाद मैदानावर आंदोलन

● कोकणच्या आंबा बागायतदार व शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन
● २३ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर पहिले आंदोलन.

मागील पाच वर्ष हवामान बदलामुळे कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी अत्यंत अडचणीत आहेत. त्यातच गेली दोन वर्ष सलग दोन चक्रीवादळ निसर्ग आणि तोक्ते , यात भर म्हणून दोन वर्ष नेमका अंबा सीजन मध्ये कोरोना यामुळे कोकणाची मुख्य  अर्थव्यवस्था असलेला हापूस आंबा आणि याकरता प्रचंड परिश्रम करणारा कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी अतिशय अडचणीत आले आहेत. अतिशय कमी उत्पादन आलें किंवा विक्री न करता आल्यामुळे प्रचंड नुकसान झाले. आणि त्यामुळे गेली पाच वर्ष कर्जाची परतफेड झाली नाही. यामुळे बँकां नविन कर्ज देत नाहीत. कोकणात  लाखो कुटुंबांचे घर चालवणारा कोकणातील हापूस आंबा उद्योगअतिशय कठीण काळातून जात आहे. 

दुर्दैवाने या वर्षी कोकणात सतत चार दिवस अवकाळी पाऊस पडला पुन्हा एकदा सर्व मोहर खराब झाला किंवा आंब्याला डाग पडले. यावर्षी सुद्धा हापूस आंब्याचे पीक अडचणीत आले आहे. उध्वस्त झालेल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांना या वर्षी मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे. कोकणातील आंबा बागायतदारांना शासन कधीच मदत करत नाही. २०१५ मध्ये तत्कालीन शासनाने व्याजमाफी जाहीर केली पण प्रत्यक्षात दिली नाहीं. त्यानंतर व्याजा मध्ये सवलत देतो असे सांगण्यात आले ती ही दिली नाही. कोकणातला शेतकरी, आंबा बागायतदार कायम दुर्लक्षित आहे.

कोकणातील आंबा उद्योगाला पुन्हा उभारणी मिळावी  आणि कोकणची मुख्य अर्थव्यवस्थेला आधार मिळावा याकरता कोकणातील शेतकरी आणि बागायतदार पहिल्यांदा मुंबईत आझाद मैदान येथे आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करीत आहेत. ही कोकणातील एका मोठ्या शेतकरी आंदोलनाची सुरुवात आहे. आपल्या न्याय्य हक्कांसाठी आता कोकणातील  शेतकरी गावागावात आणि बागा बागांमध्ये आंदोलन करणार आहेत.

महाराष्ट्रात शेतकऱ्यांना तीन वेळा कर्जमाफी दिली गेली. मात्र याचा लाभ कोकणातील शेतकऱ्यांना पुरेसा मिळत नाही. कारण नगदी शेतीचे कोकणात प्रमाण कमी आहे. कोकणातील शेतकऱ्यांना खरी मदत म्हणजे हापूस आंबा ,काजू आणि चिकू बागायतदारांना मदत मिळणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पश्‍चिम महाराष्ट्रात ऊस आणि साखर उद्योग, विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस शेती आणि धान  यांना मदत केली जाते आणि ग्रामीण अर्थव्यवस्था सांभाळली जाते  तशाच स्वरुपाची मदत कोकणातील आंबा काजू नारळ चिकू बागायतदारांना करणे आवश्यक आहे. आणि म्हणून कोकणातील सर्व शेतकरी एकत्र येऊन  शेतकऱ्यांचे पहिले भव्य आंदोलन आयोजित करीत आहेत.

●प्रमुख मागण्या

◆कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा

◆हापूस आंबा व या सोबत अन्य फळपिकांना  संपूर्ण कर्जमाफी द्यावी.

◆शून्य वीजचोरी असलेल्या कोकणांत पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना कृषी दराने योग्य विज बिल यावे वाणिज्य दराने भरमसाठ वीज बिले पाठवणे बंद करावे.

◆काजू बी आणि सुपारी या कोकणातील दोन मुख्य पिकाला हमीभाव मिळावा

◆आंबा , चिकू  या मुख्य फळांच्या मार्केटिंगसाठी पणन विभागाने ठोस योजना बनवावी  सिझन मध्ये ठीक ठिकाणी राज्यात आणि देशात  थेट शेतकऱ्यांची आंबा विक्री केंद्रे उभारावीत.

◆अपेडा, पणन, कोकणातील लिड बँका  व राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून  कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले जावे.

◆कोकणातील आंबा बागायतदारांची कर्जमुक्ती आणि नुकसान भरपाई या मुख्य मागणीसाठी कोकणातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचे निश्चित केले आहे. 

कोकण विकास चळवळीतील सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी , कोकणवासीय चाकरमानी, कोकणातील विविध सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी २३ डिसेंबर रोजी एक दिवस रजा काढून या आंदोलनात सक्रिय सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने केले आहे.कोकण आंबा उत्पादक व विक्रेता संघपावस ,देवगड, केळशी ,अलिबाग येथील आंबा बागायतदार संघ आणि शेतकरी संघटना. कोकण शक्ती महासंघ, कोकण हायवे समन्वय समिती व समृद्ध कोकण प्रदेश संघटना अशा कोकणातील संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलनं आयोजित केले आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.