आणिक स्मृती ठेवुनी जाती..

● कृष्णा कोयंडेच्या निधनाने प्रशासन आणि समाजकारणातील दुवा हरपला
● राज्य हक्क आयोगाच्या कक्ष अधिकारी पदाची भूषवली होती कणखर जबाबदारी
● मंत्रालय कर्मचाऱ्याच्या मॅको बँकेचीही सांभाळली होती यशस्वी धुरा 



पत्रकारितेमुळे माझ्या जीवन प्रवासात अनेक माणसे मला भेटतात त्यातील काही स्मरणात राहतात काही विस्मृतीत जातात.  हो... विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या बाबतीत मेंदूला थोडा ताण दिला की तीही माणस माझ्या स्मृती पटलावर पुन्हा येतात. खर सांगायच तर कृष्णा कोयंडे साहेब हे माझ्या आयुष्यात आलेल्या व्यक्तींपैकी  स्मरणात राहणारी व्यक्ती होती! याच कारण म्हणजे कृष्णा कोयंडे हे ज्योती वाघचे मिस्टर म्हणून नव्हे तर कोयंडे सायबाना माजी मंत्री दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक असल्यापासून ओळखत होतो.

 आम्हा मालवणच्या पत्रकारांचा आमदार वैभव नाईक यानी तीन वर्षांपूर्वी मुंबईचा अधिवेशन काळात अभ्यास दौरा काढला होता त्या दौऱ्यात मी सहभागी झालो होतो. आणि त्याच वेळी आम्ही पत्रकार मंडळींनी मुंबईत दीपक भाईंची भेट घेतली होती . दीपक भाई त्यांच्याकडे आलेल्या लोकांशी संवाद साधताना अधूनमधून एका रुबाबदार व्यक्तीकडे नजर फेकीत सूचना देत होते ती व्यक्ती माझ्या तशी काही परिचयात नव्हती. मी माझ्या सोबत असणाऱ्या एका ज्येष्ठ पत्रकाराला विचारल सुद्धा... दीपकभाई ज्यांना सूचना देतायत ती व्यक्ती कोण ? माझ्या त्या मित्राने हसत हसत म्हटल , अरे प्रफुल्ल... तू त्यांना ओळखत नाही.. ते आपल्या आचऱ्याचे कोयंडे.... हुशार माणूस !  मी हसतच उत्तर दिल , हुशार आहे ते कळल... दीपक भाईंच्या प्रत्येक प्रश्नाला ते लगबगीने , चटकन उत्तर देतायत आणि हो ...मी त्याला पुढे असेही म्हटल, अरे शेवटी मालवणी माणूस हुशार असणारच. दीपक भाईंची चर्चा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मी कोयंडे साहेबांकडे गेलो आणि म्हटल,  साहेब...मी  प्रफुल्ल देसाई,  मालवण.  ते म्हणाले.. हो नाव वाचनात आहे. कधी कधी भाईही तुमच नाव घेत असतात. मी आचऱ्याचा !  खर सांगू , मुंबई सारख्या महानगरीत मालवणी माणसं  भेटली की गजाली मारण्यात जी मजा असते ना ती काही औरच असते. कोयंडे साहेबांची ती भेट तासा दीड तासाची अशी ठरली होती चार पाच दिवसांचा दौरा आटोपून आम्ही मालवणला परतलो आणि दैनंदिन कामात गुरफटलो 

कामाच्या व्यापातही कधी कधी वर्गातल्या मित्र मैत्रिणीशी मोबाईल वर संवाद असायचा अश्यातच एक दिवस मोबाईलवर संगीता मोंडकर-परब बरोबर बोलताना ज्योती वाघचा रेफरन्स आला . एक वर्ग मैत्रीण म्हणून मी ज्योतीची माहिती घेतली. माहिती घेता घेता संगीता म्हणाली ज्योतीचे मिस्टर मंत्रालयात आहेत तेही आचरा गावचे. संगीताच्या या बोलण्याने माझ्या मेंदूत चाळवाचाळव झाली... पुन्हा मेंदुला थोडा ताण दिला. घाईगडबडीतच संगीताचा फोन कट केला आणि ज्योतीला फोन लावला.  बऱ्याच वर्षांनी माझा  फोन आल्याने ज्योती भडाभडा बोलू लागली. अश्यातच मी ज्योतीचे बोलणे थांबवत तिला म्हटल,  ज्योती तुझे मिस्टर मंत्रालयात दीपक भाईंकडे होते का ? तिने होय  म्हटल्यावर मी तिला विचारल... ते घरी आहेत का ?  तिने काही उत्तर न देताच कोणाकडे तरी फोन दिला.... समोरून मृदू आवाजात कानावर शब्द आले ,"हॅलो...... कृष्णा कोयंडे बोलतोय".  फोनवर त्यांचं नाव ऐकल्यावर मी ही त्यांना म्हटल , साहेब... ओळखलत का? मी माझ नाव सांगितल, आणि आमच्या गप्पा रंगल्या. आमच्या दोघांच्या बोलण्याने ज्योती केव्हाच बाजूला पडली होती. बऱ्याच दिवसांनी दोन मित्र भेटावेत आणि त्यांच्या गप्पा रंगाव्यात अश्याच आमच्या गप्पा रंगल्या...खर तर वीस पंचवीस मिनिटांमध्ये झालेल्या आमच्यातील त्या गप्पा या  मला काही अनोख्या विश्वात घेऊन गेल्या. 

खरतर हाय ...हॅलो  म्हणण्यापूरते  कोयंडे साहेबांच बोलणे कधीच  नव्हते. माणसे कशी जोडावीत याची  कला कोयंडे साहेबांमध्ये होती. ही कला त्यांनी आयुष्यभर जोपासली.... अखेरच्या क्षणापर्यंत कोयंडे साहेब हे माणसांमध्ये राहिले. आणि म्हणून कोयंडे साहेबांच आमच्यातून अकाली निघून जाणं हे आज प्रत्येकाच्या जिव्हारी लागलय. 

सर्वसाधारणपणे गणेश चतुर्थी म्हटली की, कोकणी माणूस हा गावी येतो आणि गावाची ओढ असणारे कोयंडें सारखी माणस तर गणपतीला हमखास गावी येतातच . गणेश चतुर्थीच्या  बहुदा तिसऱ्या - चौथ्या  दिवशी सायंकाळच्या वेळी बातमीच्या गडबडीत असतानाच ज्योतीचा फोन आला .अरे , प्रफुल्ल.... कुठे आहेस तू ?  मी घरी आहे असे म्हटल्यावर ती म्हणाली, मी तुझ्या घरी येतेय.. तिने हे अस म्हटल्यावर पाच दहा मिनिटांनी माझ्या दारासमोर  फोर व्हीलर उभी राहिली. फोर व्हीलर मधून ज्योती आणि कोयंडे साहेब हे आपला मुलगा आणि मेहुण्या समवेत गाडीतून खाली उतरले. त्यांना घरात बोलविल्यानंतर मी माझ्या पत्नीला ... मनिषाला म्हटलं ही माझी वर्गमैत्रीण ज्योती..तुझ्या वाघ बाईचा चेडू ..मनिषानेही हसून स्वागत केले आणि  विधान भवनातील त्या आठवणीसह सुमारे तास दीड तास कोयंडेंसाहेबांबरोबर आमच्या गप्पा रंगल्या आणि या गप्पांमध्ये एक गोष्ट लक्षात आली की प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या कोयंडे साहेबांना कोकणाबद्दल विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाबद्दल अतीव तळमळ आहे. त्यांच्या  बोलण्यात शासकीय योजनांचा लाभ कसा करून घेता येईल याच सुंदर विवेचन कोयंडे साहेब करत होते. आणि हे विवेचन करतानाच कोयंडे साहेबांच्या बुद्धीमत्तेची झलक आणि कोकणाविषयी असलेली तळमळ मला जाणवत होती.

 खरतर कोयंडे साहेबांच्या विचारांना आणि त्यांच्या कार्यपद्धतीला मी मनातल्या मनात सलाम ठोकत होतो. साहेबांच बोलण सुरू असतानाच साहेब म्हणाले, आता उशिरा झालाय पुढच्या गणपतीला देसाई... नक्की तुमच्याकडे वेळ काढून येईन ..मी म्हटल, साहेब.. नक्की या वाट बघतोय. गणेश चतुर्थीच्या त्या भेटीनंतर साहेबांचे  आणि माझे  बोलण कामाच्या व्यापामुळे कधी झाल नाही पण गणेश चतुर्थीला गप्पा मारण्यासाठी साहेब नक्की येतील याची खात्री मला होती आणि ही खात्री असतानाच रणजितने सांगितलेली ती बातमी अनपेक्षित अकल्पित आणि मन सुन्न करणारी होती. साहेब तुम्ही पुन्हा या अस मीच काय माझ्या बरोबर त्यांच्या जिवलगानी कितीही टाहो फोडून सांगितल तरी ती गोष्ट आता साध्य होणारी नाही. परंतु काही गोष्टी या भाबडी आशा दाखवितात आणि त्या भाबड्या आशेवरच माणूस जीवनाच्या प्रवासात सामील होतो तीच भाबडी आशा मनी बाळगीत ओंजळीतील शब्दरूपी फुले अर्पण करून म्हणतो ...साहेब , तुम्ही परत या !

- प्रफुल्ल देसाई , मालवण
09422584759

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.