कल्पनाशक्तीला नवे कंगोरे फुटण्यासाठी वाचन आवश्यक! ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विठ्ठल गाड यांचे प्रतिपादन; भंडारी हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात

 Reading Develops Imagination, Says Dr. Vitthal Gad at Bhandari High School in Malvan


मालवण (प्रतिनिधी) : “कल्पनाशक्ती विकसित करण्यासाठी वाचन आवश्यक आहे. वाचनामुळे कल्पनाशक्तीला नवनवे कंगोरे फुटतात. लेखक किंवा साहित्यिक व्हायचे असेल, तर पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. एखादे ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते. पुस्तकांमधून प्रेरणा मिळते. त्यामुळे वाचन करा, लिखाण करा आणि साहित्यनिर्मितीसाठी योग्य विषय निवडून त्याचा सखोल अभ्यास करा,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, लेखक व कवी डॉ. विठ्ठल गाड यांनी केले.

भारताचे माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात डॉ. गाड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.

वाचन आणि लेखन यांचा परस्परसंबंध स्पष्ट करताना डॉ. गाड यांनी साहित्यनिर्मितीसाठी केवळ शब्दांचे ज्ञान पुरेसे नसल्याचे सांगितले. विषयाचा सखोल अभ्यास, सूक्ष्म निरीक्षण, चिंतन आणि सातत्यपूर्ण वाचन या गोष्टी साहित्यनिर्मितीसाठी महत्त्वाच्या आहेत, असे त्यांनी नमूद केले. “शब्दांच्या मागे धावता, तेव्हा शब्द तुमच्याकडे येतात. ते तुमच्या जवळ येतात, तुमचे मित्र बनतात आणि त्यातूनच साहित्याचा जन्म होतो,” या शब्दांत त्यांनी विद्यार्थ्यांना लेखनाची प्रेरणा दिली. मनातील कल्पनांना शब्दरूप देण्यासाठी वाचनाची सवय जोपासण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी भंडारी एज्युकेशन सोसायटी, मालवण-मुंबईचे कमिटी मेंबर यश केरकर यांनी डिजिटल युगातील वाचनाचे महत्त्व विशद केले. मोबाईलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचा पुस्तकांशी असलेला संपर्क कमी होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम भाषिक विकास आणि संवाद कौशल्यांवर होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. वाचनामुळे शब्दसंपदा समृद्ध होते, विचारांना दिशा मिळते आणि व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज काही वेळ पुस्तकांच्या वाचनासाठी राखून ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहाय्यक शिक्षिका संजना सारंग यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी संस्थेचे कौन्सिल सदस्य रामदास मयेकर, लोकल कमिटीचे सेक्रेटरी दशरथ कवटकर, मुख्याध्यापक आर. डी. बनसोडे, सहाय्यक शिक्षिका संजना सारंग, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कथाकथन आणि निबंध लेखन स्पर्धांतील विजेत्यांना यावेळी पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई यांनी केले, तर शिक्षिका अस्मिता वाईरकर यांनी आभार मानले.

Senior Marathi litterateur Dr. Vitthal Gad highlighted the importance of reading, writing and creativity at the Reading Inspiration Day celebration at Bhandari High School and Junior College in Malvan.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.