निवडणूक आचारसंहिता घोषित झाल्यापासून शासकीय योजनांचा प्रचार करु नये असा आदेश जारी झाल्याने काही काळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अनेक संभ्रम पसरले आहेत. याबद्दल राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यासंदर्भात खुलासा केला आहे.
अदिती तटकरे यांची सोशल मीडियावरील पोस्ट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे.
सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती !
अदिती तटकरे यांच्या खुलाशामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला स्थगिती मिळाली आहे, अथवा प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यावर निर्बंध लागले आहेत या सगळ्या अफवांचे खंडन होऊन लाभार्थी महिलांना शासकीय निर्देशित कालात लाभ मिळणार आहे.